मुंबई- 'होम मिनिस्टर' मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. दरम्यान, राज्यमंत्रिपदाचा दर्जा व्यक्तीला नाही तर सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षपदाला मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
'मी कुठलाही भत्ता घेणार नाही. मला फक्त लोकांची सेवा करायची आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा हा व्यक्तीला मिळालेला नसून सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षपदाला मिळाला आहे. त्या पदावर सध्या मी आहे, अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
आदेश बांदेकर यांच्याबरोबरच शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. तसंच पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ असून, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.