भपकेबाजीवरून वादात सापडलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबाबाबत एकेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी पिस्तूल घेऊन मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता रात्रीच्या अंधारात दांडे, कुऱ्हाडी घेऊन पोलिसांसह नागरिकांना दमदाटी करतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पोलिसांनीच पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला आहे. डॉ. च्या मिस पूजा, २०२० मध्ये ३० वर्षांच्या २०२३ मध्ये ३१; पूजा खेडकरांनी वयातही बनाव केलाहा प्रकार २०२२ मधील आहे. बाणेरमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. या भागात खेडकर यांचा ओमदीप बंगला आहे. त्या बंगल्यासमोरून मेट्रो जात आहे. या कामावरून मनोरमा आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा वाद घातला होता. मेट्रो कामासाठी आणलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी तेथील फुटपाथवर उतरविले होते. यावरून मनोरमा आणि कुटुंबियांनी वाद घातला होता. या वादानंतर पोलिसांना बोलविण्यात आले होते. या व्हिडीओमध्ये अंधारात पोलीस दिसत असून एक महिलाही जोरजोराने भांडताना दिसत आहे. याबाबतचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिलेले आहे.
तुम्ही कायदा हातात घेत दांडे आणि कुऱ्हाडी घेऊन येताय मग कोणाला सांगायचे. आम्ही कशासाठी आलोय. तुमचे काम नाही का आमच्याशी बोलायचे, असा सवाल पोलीस मनोरमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. पोलीस त्यांना विचारत असताना एक तरुण येऊन त्यांचा व्हिडीओ रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी कॅमेरासमोर हात धरताना दिसत आहे.
पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर पिस्तुल प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच आज पुणे पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. यापूर्वी पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीची नोटीस देण्यासाठी पोलीस गेले असता मनोरमा यांनी पोलिसांना आणि पत्रकारांना धमक्या दिल्या होत्या. तुम्हाला आत टाकेन, असे म्हणाल्या होत्या. तसेच गेटही उघडले नव्हते. यामुळे या वादग्रस्त मनोरमा खेडकर यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. बिल्डर बाळाच्या कुटुंबानंतर आता आयएएस खेडकर कुटुंबाची अरेरावीचे एकेक प्रकार समोर येत आहेत.