मुंबई : उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्तांचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी हे मुहूर्त असल्याने महामंडळाकडून एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा वाहतूक आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याबाबतचे आदेशच विभाग नियंत्रक आणि अन्य अधिकाऱ्यांना महामंडळाकडून देण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात घट होऊन २0१६ च्या पहिल्या तीन महिन्यांत एसटी महामंडळाला ३0 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र १५ एप्रिलपासून एसटीचे भारमान थोडेफार वाढत असून लग्नमुहूर्त आणि शाळांना सुटी असल्याचा फायदा महामंडळाला मिळत आहे. २0 एप्रिलपासून एसटीचे दररोजचे सरासरी उत्पन्न १८ कोटी रुपये असून पुढील दोन ते तीन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महामंडळाने ३0 एप्रिल आणि १ मे या मोसमातील लग्नाच्या शेवटच्या दोन मुहूर्तांचा फायदा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही दिवशी बहुतांश लांब पल्ल्याच्या बसचे आरक्षण फुल झाले आहे. ज्या मार्गांवर आरक्षण फुल झाले आहे अशा मार्गांवर प्रवासी गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी मुख्य बस स्थानके, निवारा केंद्रे व बसथांब्यांवर एसटी कर्मचारी व अधिकारी ‘प्रवासी मित्र’ म्हणून कार्यरत राहतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली या मुख्य बस स्थानकांतून पहाटे आपापल्या गावी जाण्यासाठी गावी जाणाऱ्या (स्थानिक) जादा बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत.
उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीची ‘लगीनघाई’
By admin | Published: April 29, 2016 3:02 AM