पिंपरी : काही दिवसांपूर्वी भिवंडी येथे रिक्षाचालकांच्या मारहाणीत एका एसटीचालकाच्या मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता पिंपरीमध्ये देखील चालकाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारात एसटी चालक व एका खासगी मोटारचालकात वाद झाला. एसटी बस उभ्या केलेल्या ठिकाणी अडथळा ठरेल अशा पद्धतीने मोटार नेत असताना हटकल्याचा राग आल्याने मोटारचालकाने एसटीचालकाच्या कानशिलात लगावली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. विटा (सांगली) मार्गावरील एसटीचालकाच्या बाबतीत हा प्रकार घडला. याप्रकरणी मोटार चालकाविरोधात संताप व्यक्त करून एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. स्थानकातील एसटी बस सोडण्यात आल्या नाहीत. चालकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविला. तसेच आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीन तासांनी आंदोलन मागे घेतले. तोपर्यंत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. (प्रतिनिधी)
एसटीचालकाला स्थानकात मारहाण
By admin | Published: February 16, 2017 3:14 AM