मुंबई : शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मराठी भाषेला मिळणारे दुय्यम स्थान लक्षात घेऊन, पुन्हा एकदा माय मराठीसाठी विविध संस्थांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. शिक्षण क्षेत्रातील मराठी भाषेचे स्थान राखण्यासाठी बारावीपर्यंत मराठीतून शिक्षण अनिवार्य करणे, मराठी भाषा कायदा मंजूर करणे व मराठीच्या संरक्षणासाठी प्राधिकरण स्थापणे या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लवकरच सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेने ५ जूनला सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या तिसऱ्या मजल्यावरील अमृत नाट्यभारती सभागृहात समन्वय सभा आयोजित केली आहे. बारावीपर्यंत शंभर टक्के शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करावे, मराठी भाषा कायदा मंजूर करावा आणि राबवावा, मराठी भाषेच्या संरक्षणासाठी प्राधिकरण स्थापन करावे, या मागण्या सभेपुढे मांडल्या जातील.ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या सभेत मराठी भाषा चळवळीचे कार्यकर्ते, उद्योजक, खेळाडू, कलावंत सहभागी होणार आहेत, तसेच यावेळी एक सुकाणू समिती स्थापन केली जाईल. राज्यभरातील विविध भागांतील नामवंत प्रतिनिधींचा यात समावेश असणार आहे. या समन्वय सभेनंतर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गोखले यांनी दिली.