रामदास शिंदे/ ऑनलाइन लोकमत
पेठ, दि. 27 - बदलत्या काळाबरोबर आधुनिक विकासाची कास धरत असतांना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा करून स्पधेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असतांना नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये उतरत असतांना दिसून येत आहेत.
एकेकाळी त्याच दगडी व कौलारू खोलीत टोपी , सदरा व धोतरच्या वेषातील मास्तर आणी भिंतीवर चिटकवलेल्या मळकट फळ्यावर खडूच्या साह्याने हातात छडी घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे मास्तर आणी फुटकी पाटी पिशवीत कोंबून वावरातून थेट शाळेच्या वर्गात धापा टाकत येणारी मुले. मात्र दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धत टिकण्यासाठी व स्वतःला सिध्द करून दाखवण्यासाठी शिक्षण विभाग सरसावले असून शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीण व आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सरस ठरू पाहत आहेत.
डिजीटल शाळा ही संकल्पना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तशी दुर्मिळच मात्र शिक्षकांच्या संकल्पनेतून व मोलमजूरी करून कमवलेल्या पैशातून शालेला दान करणाऱ्या ग्रामस्थांच्या जिद्दीने आज ग्रामीण भागातील बालके तंत्रज्ञानाचे धडे गिरवू लागली आहेत. शिक्षकांनी पदरमोड करून शाळाचा चेहरा मोहरा बदलला.एरवी शालेय पोषण आहार व बांधकामाच्या जोखडात सापडलेला शिक्षकाने हातात रंग आणी ब्रश घेतला. प्रथम शिक्षकांनी शाळांचा बाह्य भाग सुशोभीत केला. जमेल त्या साधनांचा वापर करून शाळा डिजिटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न तसा अभिनंदनीयच.
आज ग्रामीण भागातीत शेकडो शाळांना ई-लनिंग सिस्टीम मिळाली. संगणकाच्या साह्याने नाहीच काहीतर स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षकांनी सुरु केलेले स्मार्ट ज्ञानदान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी वरदान ठरू पाहत आहे. ग्रामीण शाळांमध्ये तरुण शिक्षकांचा भरणा तसा मोठा आहे. शिकणे व शिकवणे या दोन्हीही गोष्टी नसानसात या शिक्षकांच्या भिमल्याने झपाटल्यागत काम करताना शिक्षक दिसून येत आहेत. स्वतःची वेबसाईट बनवण्यापासून तर संगणकाचे संपूर्ण ज्ञान, शैक्षणिक हिडीओ निर्मिती.ब्लॉगच्या माध्यमातून माहितीचा खजाना शिक्षण विभागासाठी खुला करून देण्यात आला आहे.
आजच्या तंत्रज्ञान युगात सर्वच क्षेत्रात गरुडझेप घेतली . यात शिक्षणक्षेत्राने सुद्धा मोठी मजल गाठली आहे.. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संगणक विषय, दृकश्राव्य साहित्याचा अध्यापनातील वापर ते विद्यार्थ्याचे शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यत सर्वच गोष्टीनी शिक्षणक्षेत्रात नवीन वाटचाल सुरू केली आहे... यासाठी राज्यभरातुन तंत्रज्ञानस्नेही सर्व शिक्षकवृंदानी नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी जीवाची पराकाष्टा केली.. याचाच भाग म्हणून आपल्या पेठ तालुक्यातील जि.प.शाळातील उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येवून स्वत: राबविलेल्या यशस्वी तंत्रज्ञान उपक्रमाची माहिती सर्वांपर्यंत मिळावी व इतरांना राबविणे सोयीस्कर व्हावे यासाठी तसेच तंत्रज्ञानाची खर्या अर्थाने ओळख व्हावी यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यामाद्वारे पोहचविण्यासाठी वैभव शिंदे ( प्राथ. शिक्षक, जि.प.शाळा नाचलोंढी) यांनी आपल्या तंत्रस्नेही शिक्षक मित्रांशी चर्चा विनिमय करुन एक नवीन तंत्रज्ञान युक्त एक कृतीकार्यक्रमाची आखणी केली.. व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्या पेठ भागातुन राज्यभरात पोहचण्याची संकल्पना उदयास आली. ज्यात राज्यभरातुन ५००० पेक्षाही जास्त शिक्षक अधिकारी यांनी सहभाग नोंदविला आहे.
आठवड्यातुन फक्त ३ मेसेज ने सुरू झालेल्या या उपक्रमास सर्वच स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळाला.. या ज्ञानाचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील शिक्षक बांधवासाठी आत्ता विनामुल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.