लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्यक्ती अधिक काळ तणावाखाली असल्यास दोन प्रकारे व्यक्त होते. काही जण स्वत:ला क्लेष करून घेतात. नैराश्यातून भावनिक संताप वाढत गेल्यास दुसऱ्यावर राग निघतो. यामुळे तणाव, नैराश्यावर तत्काळ उपचार करणे, त्या व्यक्तीला समजून घेणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. सांताक्रुझ येथे राहणाऱ्या सिद्धांत गणोरे याने आईच्या हत्येची कबुली दिल्यावर पुन्हा एकदा वाढता ताण हा प्रश्न चर्चेत आला. केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले, अनेकदा मुले नैराश्याच्या गर्तेत अडकत जातात. या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आजच्या काळात सर्वांवर मानसिक दबाव असतो. अनेक जबाबदाऱ्या असतात, पण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीतील क्षमता ओळखणे गरजेचे आहे. अनेकदा येथे गल्लत होते. व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण केल्याने ताण वाढत जातो. तरुणांची सहनशीलता वाढवण्याची आवश्यकता आहे. भावनिक संतापाचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. भावनिक संताप व्यक्त करण्यासाठी व्यक्ती अशा पद्धतीचे पाऊल उचलू शकते. अशा वेळी व्यक्ती अनेकदा स्वत:वरही चिडलेल्या असतात. या वेळी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले, गणोरे प्रकरणात दोन शक्यता आहेत. एक म्हणजे त्या मुलाला मानसिक आजार असू शकतो अथवा त्याच्या मनात खूप काळ राग साचून राहिलेला असू शकतो. आई आणि मुलाचे नाते हे खूप वेगळे असते. जन्माला येण्याआधी ९ महिने आईच्या उदरात त्यांचा संबंध जोडलेला असतो. त्यामुळे मुलाने वडिलांची हत्या केली हे प्रकार दिसून येतात, पण आईची हत्या असे प्रकार दुर्मीळ असतात. प्रत्येक घरामध्ये भांडणे होत असतात, पण असे कृत्य करण्यामागे नक्की कारण काय, हे शोधण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. मानसिक आजार असल्यास व्यक्ती असे करू शकते. अथवा त्याच्या मनात खूपच राग असू शकतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या म्हणण्यानुसार, या मुलाला आपण वाईट कृत्य करतो आहोत याची जाणीव असणार. यानंतर आपण पकडले गेलो तर शिक्षा होऊ शकते. त्यामुळेच त्याने मेसेज लिहिला असण्याची शक्यता आहे. अनेक घरांमध्ये अस्वस्थता असते. प्रत्येक व्यक्तीला पे्रम मिळतेच असे नाही. पण त्या व्यक्तीला स्वीकारले आहे, ही भावना महत्त्वाची असते. स्वीकारले नाही तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडू शकते.
नैराश्यातूनच उचलले जाते टोकाचे पाऊल
By admin | Published: May 27, 2017 2:32 AM