चंद्रकांत जाधव/ ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 16 - जळगाव तालुक्यातील धानोरा, कुऱ्हाडदा व दापोरा येथील दूध उत्पादकांना वर्षभरासाठी आगाऊ रक्कम देऊन त्यांच्या दूधाला प्रचलित दर न देता आर्थिक शोषण करणाऱ्या दूध संकलन करणाऱ्या मध्यस्थांच्या जोखडातून दूध उत्पादकांना बाहेर काढण्यात आले आहे. या उत्पादकांच्या दूधाला प्रचलित दर मिळवून देण्याचा प्रयत्न गांधी रिसर्च फाउंडेशन (जीआरएफ) व नाबार्ड (नॅशनल बँक आॅफ अॅग्रीकल्चरल अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट) यांनी केला. या प्रयत्नामुळे दूध उत्पादकांना आपल्या कष्टाचे मोल मिळू लागले आहे. अर्थातच ही धवल क्रांती या तीनही गावांच्या दृष्टीने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणारी ठरत आहे. या गावांमध्ये मागील तीन वर्षांपासून गांधी रिसर्च फाउंडेशनचे ग्रामविकास कार्यवाह काम करीत आहे. या अंतर्गत धानोरा येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. धानोरा येथे राजेंद्र जाधव, दापोरा येथे सागर चौधरी व कुऱ्हाडदा येथे राहुल लांबेळे हे कार्यरत आहे. ग्रामीण विकासासंबंधीच्या गरजा, उपक्रम याची त्यांना माहिती व्हावी, ग्रामीण नेतृत्व विकास याचे प्रशिक्षण यासंबंधी हे कार्यवाह गांधी रिसर्च फाउंडेशनने पाठविले होते. अशातच या गावांमधील दूध उत्पादकांना वर्षभरासाठी मोठी आगाऊ रक्कम काही दूध संकलन करणारे मध्यस्थ द्यायचे व नंतर ३० व ३२ रुपये दरात त्यांचे दूध खरेदी करायचे. दूध हप्त्यापोटी जी रक्कम मध्यस्थ दर १० दिवसात या दूध उत्पादकांना द्यायचे त्यातूनच आगाऊ रकमेतील काही रक्कम कपात करायचे... दुसऱ्या बाजूला या दूध उत्पादकांकडून दूध कमी दरात घेऊन त्याची शहरात ४० ते ५० रुपये लीटरने सरसकट विक्री करायचे... हा सर्व प्रकार गांधी रिसर्च फाउंडेशनच्या लक्षात आले.
शेतकरी उत्पादक संघाची स्थापनायासंदर्भात दूध उत्पादकांना संघटीत करून दूधाचे विपणन, त्याचे दर, ग्राहकांशी थेट जुळण्याचे लाभ अशा बाबींची माहिती देण्यात आली. या गावांमध्ये शेतकरी उत्पादक संघाची स्थापना केली. दापोरा येथे २५, धानोरा येथे १५ व कुऱ्हाडदा येथ ३० उत्पादक सहभागी झाले. धानोरा व कुऱ्हाडदा येथे २ आॅक्टोबर २०१६ म्हणजेच अहिंसा दिन, महात्मा गांधी जयंतीला तर दापोरा येथे १ जानेवारी २०१७ ला हा संघ स्थापन झाला. दूध उत्पादकांना दूधाची प्रक्रिया, विपणन यासंबंधीची माहिती गुजरात दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात आली.
४० व ५० रुपये दर मिळू लागलाधानोरा येथील दूध उत्पादकांचे सकाळचे दूध जैन इरिगेशनच्या राजाभोज केंद्रात दिले जाते. सायंकाळचे दूध संबंधित उत्पादक स्वत: जळगावात येऊन थेट ग्राहकांना देतात. दापोरा व कुऱ्हाडदाचे उत्पादक दूध संघाला दूध पुरवठा करतात. संघातर्फे जे दर आहेत ते या उत्पादकांना मिळतात. पण धानोरा येथील उत्पादकांना गायीच्या दूधाला ४० व म्हशीच्या दूधाला ५० रुपये दर मिळतो. दापोरा येथे ३५० लीटर, कुऱ्हाडदा येथे ५५० लीटर रोजचे दूध संकलन होते. पूर्वी दापोरा येथे फक्त संबंधित दूध उत्पादक ८० लीटर दूध उत्पादन करू शकत होते. आता या गावात दूध उत्पादनात वाढ झाली आहे.
अर्थसाहाय्य करून उभारीसंबंधित दूध उत्पादकांना संकलन केंद्र, तपासणी यंत्रणा, मोजणीचे साहित्य आदींसाठी निधीची गरज होती. त्यासाठी नाबार्डतर्फे धानोरा येथील उत्पादकांना सव्वादोन लाख, दापोरा येथे ९० हजार व कुऱ्हाडदा येथे ६० हजार रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. कमी व्याजदरात हे कर्ज दिले. त्यातील कुऱ्हाडदाच्या गटाने ६० हजारांची परतफेडही केली आहे. प्रक्रिया व विपणनसाठी प्रकल्पया गावांमध्ये दूध प्रक्रिया व त्याचे विपणन यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. उत्पादक स्वत:च्या ताकदीवर उभे राहीले तर विकासाला चालना मिळते. शेतमालाच चांगला दर मिळतो, असे या शेतकऱ्यांना लक्षात आले व ते विकासाच्या मार्गावर चालू लागल्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक जॉन म्हणाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना विपणन, प्रक्रिया याबाबतची माहिती देण्यात आली. दापोरा, कुऱ्हाडदा, धानोरा येथे या उपक्रमाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना लाभ झाला. गांधी रिसर्च फाउंडेशन व नाबार्ड यांच्या साहाय्याने हे शक्य झाले. -जी.एम.सोमवंशी, सहायक महाव्यवस्थापक, नाबार्ड