ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5- राज्य मार्ग परिवहन महामंडळ भाडेतत्त्वावर घेत असलेल्या विना वातानुकूलित स्लिपर बसेसचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहन विभागाने या बसेसच्या नोंदणीसाठी परवानगी दिली असून मोटार वाहन नियमात योग्य ती तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र, नुकतेच महामंडळाला प्राप्त झाले आहे.खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि एसटीचे कमी झालेले प्रवासी पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५०० एसी शिवनेरी व नॉन एसी स्लीपर बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात वाढ करत आता एकूण एक हजार बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यातील ५०० बसेसची निविदा प्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने विना-वातानुकूलित (नॉन एसी) स्लिपर बसेसची नोंदणी परिवहन विभागामार्फत परवानगी देण्यात यावी व त्या प्रमाणे मोटार वाहन नियमात योग्य ती तरतूद करण्यात यावी, अशी विनंती महामंडळाने केली होती. यावर परिवहन विभागाने परवानगी दिली असून महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १८३-अ मधील उपनियममधून सवलत देण्यात आली आहे, असे पत्र परिवहन आयुक्तांनी नुकतेच महामंडळाला दिले आहे. यामुळे भाड्याच्या नॉन एसी स्लिपर बसेसचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसटीच्या स्लीपर बसेसचा मार्ग मोकळा
By admin | Published: May 05, 2016 10:03 PM