ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावरील बंदी उठवल्यानंतरही त्यांनी विमानाऐवजी रेल्वेला पसंती दिली आहे. रविंद्र गायकवाड राजधानी एक्सप्रेसने दिल्लीत दाखल झाल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहका-याने दिली. राजधानी एक्सप्रेस मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटल्यानंतर बोरिवलीमध्ये थांबा घेते.
गायकवाड मुंबई सेंट्रल येथून ट्रेनमध्ये बसले की, बोरिवलीमधून ते माहित नाही असे जीतेंद्र शिंदे यांनी सांगितले. ते गायकवाडाचे जवळचे सहकारी आहेत. संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत गायकवाड दिल्लीमध्ये थांबणार असल्याची माहिती जीतेंद्र शिंदे यांनी दिली.
एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलेने मारहाण केल्यानंतर हवाई कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टच्या यादीत समावेश केला होता. त्यामुळे त्यांच्या हवाई प्रवासावर बंदी आली होती. मागच्या आठवडयात नागरी हवाई उड्डयाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या प्रवासावरील बंदी हटवण्यात आली. मागच्या आठवडयातही गायकवाड राजधानी एक्सप्रेसने मुंबईत आले होते.
दरम्यान, रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच, एअर इंडियाकडून त्यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदीही हटवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतर जोपर्यंत रविंद्र गायकवाड विनाशर्त एअर इंडियाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील निर्बंध कायम ठेवावेत, अशी मागणी ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन (AICCA)ने केली होती. अखेर, एअर इंडियाने त्यांच्यावरील प्रवासबंदी मागे घेत त्यांचा विमान प्रवासाचा मार्ग मोकळा केला.