पुणे : जून महिन्यातील पाऊस तब्बल दोन आठवडे लांबल्याने राज्यातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. राज्यात अवघ्या १ लाख ३१ हजार ८१२ हेक्टरवरील पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी जून महिना अखेरीस तब्बल ३९ लाख ८८ हजार ३२२ हेक्टरवरील पेरण्या उरकल्या होत्या. जूनच्या शेवटच्या पाच दिवसांत पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने, पेरण्यांच्या कामाला वेग आला असल्याचे, कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात १ ते २५ जून या कालावधीत सरासरी १८६.१ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात या काळात ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यानंतर राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला असला तरी, जूनची सरासरी गाठलेली नाही. राज्यात ऊस पिक वगळून खरीपाचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, ऊस पिकासह १४९.७४ लाख हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ३१ हजार ८१२ (०. ८८ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अवघ्या ३.३० टक्के क्षेत्रावरील पेरणीची कामे झाली आहेत.
जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात कोकण, नाशिक आणि पुणे विभागातील भात पट्ट्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील भात रोपवाटिकांची कामे सुरु झाली आहेत. त्यातही ठाणे आणि पुणे विभागात अनुक्रमे २० हजार २१६ व १ हजार ८२१ हेक्टरवरील रोपवाटिकांची कामे झाली आहेत. तर, ठाण्यात १ हजार ६८१.७ हेक्टरवर आणि पुण्यात ७५ हेक्टरवर नाचणीच्या रोपवाटिकांची कामे झाली आहेत. राज्यात भाताचे एकूण क्षेत्र १५ लाख ८ हजार २१७ हेक्टर असून, पैकी ४६ हजार ३०१ हेक्टरवरील (३ टक्के) भात रोपवाटिकांची कामे झाली आहेत. गेल्यावर्षी याच काळात ९४ हजार १५९ हेक्टरवरील भाताची कामे उरकली होती.
राज्यात सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ हेक्टर असून, प्रत्यक्षात अवघ्या २ हजार १४ (०.०६ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात १२ लाख ९३ हजार ६३८ हेक्टरवर पेरणी झाली होती. कापसाचे क्षेत्र ४१ लाख ९१ हजार १४५ हेक्टर असून, त्या पैकी ७४ हजार ५९७ हेक्टरवर (२ टक्के) पेरणी झाली. गेल्यावर्षी १६ लाख ५७ हजार २३८ हेक्टरवरील पेरणीची कामे झाली होती.