डोंबिवली : कार्तिक नावाच्या मित्रने केलेल्या अत्याचाराचा बळी ठरलेली मुलगी उपचारांना प्रतिसाद देत असून, तिच्या जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी व पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र मित्रने शीतपेयातून दिलेल्या उत्तेजक औषधाचा परिणाम तिच्यावर अजूनही असल्याने झाल्या प्रकाराबद्दल ती फक्त ‘कार्तिक’ एवढाच शब्द उच्चरून माहिती देत आहे. तसेच ती तिला दाखविलेल्या छायाचित्रंना ओळखू शकत नसल्यामुळे तपास थंडावला आहे.
सोमवारी संध्याकाळी घरातून दूध आणण्यासाठी गेलेली मुलगी रात्री उशिरार्पयत घरी न पोहोचल्याने शोधाशोध करणा:या पालकांना ती घराजवळच अत्यवस्थ अवस्थेत आढळली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर असून नेमके काय झाले होते, याबाबतची सर्वतोपरी चौकशी सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी दिली. संबंधित मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार त्यांची ही मुलगी सोमवारी संध्याकाळी दूध आणण्यासाठी घरातून बाहेर गेली, मात्र त्यानंतर रात्री उशिरार्पयत ती घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू केली. तिने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कार्तिक नामक मुलाने तिला भेटून त्याचा वाढदिवस असल्याने पार्टी देण्याबाबत चर्चा केली. तिनेही त्यास होकार दिल्याने त्याने तिला एका शीतपेयाची बाटली दिली. त्यानंतरची माहिती तिला अद्यापही सांगता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कार्तिकवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
या प्रकरणाबाबत गँगरेपसह संबंधित मुलीचा मृत्यू असे विविध मेसेज पाठवण्यात येत असून, ते धादांत खोटे आहेत. जे कोणी असे करीत आहेत त्यांचाही तपास सुरू आहे, कोणीही खोटी व संबंध नसलेली माहिती पसरवू नये. सध्या संबंधित मुलगी ज्या ठिकाणी उपचार घेत आहे त्या ठिकाणी पोलीस आहेतच. सर्व उपचारांना ती योग्य प्रतिसाद देत असून डॉक्टरांच्या चर्चेनुसार लवकरच तिला घरीही पाठविण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी दिली.
नेमके काय घडले याचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यातील तीन पथके तयार केली आहेत. ती मुलगी ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे त्या ठिकाणच्या कार्तिक नामक मुलांची चौकशी केली. काहींचे ओळखपत्र तिला दाखवले, मात्र तिने कोणालाही ओळखले नाही.