पुणे : न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस स्थानकाच्या परिसरातील अवैध प्रवासी वाहतूकीला आळा बसत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या दहा दिवसात पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, तसेच पुणे रेल्वे स्टेशन स्थानकाच्या परिसरात तब्बल १२६० अवैध प्रवासी वाहने आढळून आली आहेत. या वाहनांचे क्रमांक एसटी प्रशासनाकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच संबधित पोलीस ठाण्यांमध्ये कळविण्यात आली असून त्यानुसार, कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू आहे. न्यायालयाच्या या आदेशाची माहिती एसटी प्रशासनाकडून सर्व स्थानकांच्या परिसरात लावण्यात आली आहे. त्यानंतरही बिनादिक्कत ही वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. एसटी स्थानकाच्या परिसरातील अवैध वाहतूकीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच त्यासाठी एसटी प्रशासनानेही उपाय योजना करण़्याच्या सूचना देण्यात आलेला आहेत. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या पुणे विभागात प्रत्येक विभागात बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात उभ्या असलेल्या प्रवासी वाहनांची माहिती संकलीत करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी संकलीत केलेल्या माहितीनुसार, १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत स्वारगेट बस स्थानकाच्या २०० मीटर परिसरात बंदी असतानाही, तब्बल ६५२ प्रवासी वाहने आढळून आली आहेत. त्यात २५९ टुरिस्ट बस तर ३९३ प्रवासी जीप आहेत. तर शिवाजी नगर आणि स्टेशन बस स्थानकाच्या परिसरात तब्बल ६०८ वाहने आढळून आली असून या सर्व प्रवासी बस आहेत. प्रशासनाकडून या बसेसचे क्रमांक दररोज प्रादेशिक परिवहन कार्यालयासह संबधित पोलीस ठाण्यात पत्रासह देण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. मात्र, थेट कारवाईचे अधिकार एसटीला नसल्याने स्थानकांच्या परिसरात 200 मीटर मध्ये प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती संकलीत केली जात आहे. ही माहिती प्रादेशिक परिवहन विभाग तसेच पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली असून त्यानुसार, त्यांच्याकडून कारवाईची प्रक्रीयाही सुरू आहे. या बाबत या दोन्ही विभागांशी एसटी कडून समन्वय साधला जात आहे.- शैलेश चव्हाण, (पुणे विभाग नियंत्रक)
एसटीला अवैध वाहतुकीचे ग्रहण
By admin | Published: February 17, 2016 1:28 AM