मुंबई : जुन्या नोटांवरील बंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्वीकारण्यात आला असून, तिकीट खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिन बसवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. खिडक्यांवर असणाऱ्या या मशिनद्वारे कार्ड स्वाइप करून तिकिटांचे शुल्क भरता येईल. प्रवाशांच्या सेवेसाठी राज्याच्या ३१ विभागांमध्ये या मशिन बसवण्यात येतील. सुरुवातीला दादर-पुणे-दादर, पुणे-औरंगाबाद, स्वारगेट-मुंबई, बोरीवली-स्वारगेट, पुणे-नाशिक अशा विनावाहक सेवांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ई-तिकीटचीही सोय करण्यात आली असून, महामंडळाच्या संकेतस्थळावरून आणि मोबाइल अॅपवरून प्रवाशांना उपलब्ध करून दिले असल्याचे सांगण्यात आले. महामंडळाच्या बसेसना टोल ई-टॅग प्रणालीद्वारे एसटी महामंडळ भरणार आहे. महामार्गावरील जवळपास ३,५00 बसेसना हे टॅग बसवण्यात आले असून, त्यामुळे टोलची रक्कम ही बँकेतून अदा केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पुणे मार्गावर एसटीची ‘कॅशलेस’ सेवा
By admin | Published: January 28, 2017 4:11 AM