ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 10 - सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात शॉर्ट ड्रेस घातला म्हणून पाच जणांनी तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 1 मे रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
पिडीत तरुणीने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपींनी तिला केसाने ओढून गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. 'आमच्या कुटुंबातील कोणतीच मुलगी असे तोकडे कपडे घालत नाही, आणि सकाळी 5 वाजता पुरुषांसोबत अशी फिरत नाही', असं म्हणत आरोपींनी मारहाण केल्याची माहिती पिडीत तरुणीने दिली आहे.
तरुणीने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र एक आठवडा उलटून गेला तरी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिका-याशी संपर्क साधल्यानंतर कारवाई करण्यात आली असं पिडीत तरुणीने सांगितलं आहे. ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस आय़ुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली आहे.
1 मे रोजी पिडीत तरुणी आपल्या 2 मित्रांसोबत गाडीने घरी जात होती. सिग्नलवर गाडी थांबलेली असताना बाजूच्या गाडीत बसलेल्या लोकांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली. मला अपशब्द वापरले, त्यानंतर गाडीला घेराव घातला. गाडीची काच खुली असल्याने त्यांनी माझे केस पकडले आणि ओढून बाहेर काढलं. माझ्याच घरासमोर मला मारहाण करण्यात आली. माझ्या मित्रांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी पुन्हा आमचा पाठलाग करुन आम्हाला शिवीगाळ केल्याचं पिडीत तरुणीने सांगितलं आहे.