आॅनलाईन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 2 - दीड लाखाच्या रोकडसह चोरीस गेलेले एटीएम मशीन म्हसवडमध्ये फोडलेल्या स्थितीत रिकामे आढळून आले. चोरट्यांनी संबंधित मशीनमधील रोकड लंपास केली असून, रविवारी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ते मशीन ताब्यात घेतले.
मलकापूर येथील लाहोटीनगरजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. शाखेच्या शेजारी उपमार्गालगत असलेल्या इमारतीत याच बँकेचे काही वर्षांपूर्वी एटीएम सुरू करण्यात आले आहे. २ मार्च रोजी नेहमीप्रमाणे कॅश भरणाºया कंत्राटदार कंपनीने एटीएम मशीनमध्ये कॅश भरणा केल्यामुळे हे मशीन सुरूच होते. मात्र, त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी मशीनमधील रोकडसह मशीनच लंपास केले. दुसºया दिवशी ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासही सुरू केला. संबंधित एटीएम रात्री दोन वाजता बंद पडल्याची आॅनलाईन नोंद बँकेमध्ये झाली होती. त्यामुळे दोन वाजताच चोरट्यांनी ते मशीन तेथून उचलले असावे, अशी शक्यता निर्माण झाली. मात्र, सीसीटीव्ही नसल्याने चोरटे कॅमेºयात कैद झाले नव्हते. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, घटनास्थळावर दाखल झालेल्या श्वानाने एटीएमपासून उपमार्गापर्यंतच माग काढला. तेथेच श्वान घुटमळले.
गत काही दिवसांपासून पोलिस या चोरीचा तपास करीत आहेत. त्यातच रविवारी म्हसवडमध्ये निर्जनस्थळी एटीएम मशीन पडल्याची माहिती कºहाडच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता मशीन तोडलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी संबंधित मशीन तोडून त्यामधील रोकड लंपास केली आहे.