मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांची धावपळ झाली आहे. अशात मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने विकासकाचे तीन कोटी रुपयांचे काळे धन पांढरे करण्याच्या नावाखाली चोरीचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुझमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्या पाठोपाठ पोलीस अधिकाऱ्याचीही अटकेची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, याबाबत बोलण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला.वांद्रे येथील बांधकाम व्यावसायिक संजय नाईक यांच्याजवळ तीन कोटी रुपयांच्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा होत्या. अशात त्यांनी ही बाब सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाच्या कानावर घातली. तेव्हा आपली बँकेमध्ये ओळख असल्याचे सांगून, हे तीन कोटी रुपये बँकेतून बदलून घेण्याचे काम हाती घेतले. आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडून सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून ही रक्कम बदलून देण्याचे आमिष या अधिकाऱ्याने नाईक यांना दाखविले होते.त्यानुसार, बुधवारी दुपारी नाईक पैसे घेऊन सांताक्रुझमध्ये पोहोचले. बँकेजवळ कार उभी करण्यास जागा नसल्याचे कारण सांगून, सहायक पोलीस निरीक्षक पैशांच्या बॅगा घेऊन त्यांच्यासोबत चालत बँकेत जात होते. हीच संधी साधून पोलिसाच्या ओळखीचे असलेल्या राजन सावंत उर्फ राजू, मारुती गोईल, महेश शेट्टी आणि अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तीन कोटी रुपये घेऊन पसार झाले.पोलीस अधिकाऱ्यानेच चोरीचा बनाव करून काळा पैसा पांढरा करण्याच्या बहाण्याने तीन कोटी रुपये लुटल्याची माहिती मिळताच, विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तपास सुरू केला. रातोरात राजू, गोईल आणि शेट्टी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्याला काही रकमेसह ताब्यात घेतले. मात्र, सांताक्रुझ पोलिसांनी नाईक यांच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी नोटा चोरी करून पसार झालेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन पसार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
काळे धन पांढरे करण्यास चोरीचा बनाव
By admin | Published: November 18, 2016 5:57 AM