आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान, त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा तसेच सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगाबादमधील महालगाव येथे घडली होती. या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरणात सुरक्षेत अक्षम्य कसूर झाली आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी मागणी करत पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.
या पत्रात अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याती महालगाव येथे ही यात्रा आली. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शिंदे गटातील आमदार रेमश बोरनारे यांचा मतदासंघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे आदित्य ठाकरेंच्या सभेत मोठा राडा झाला. सभेवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सभा संपवून निघताना आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि गाडीवरही दगडफेक करण्यात आली. मंगळवारी माता रमाई यांची जयंती असल्याने गावात पूर्व नियोजित मिरवणूक सुरू होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकले. मात्र सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे कारमध्ये बसून जात असताना मिरवणुकीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या पोलीस बंदीबस्तात आदित्य यांना गावाच्या बाहेर काढण्यात आले. आदित्य ठाकरे गेल्या नंतर बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता.