मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व मधल्या काळात कमकुवत झाले होते. 2014 ते 2019 या कालावधीत भाजपने पुण्यात चांगलेच बस्तान बसवले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजपने जिंकत अजित पवारांना धक्के दिले होते. मात्र पुन्हा एकदा पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अजित पवार यांनी पक्ष संघटन पूर्वीसारखे करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपकडून जिल्ह्यात अजित पवारांचा झंझावात रोखण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील, गिरीशभाऊ बापट आणि संजयनाना काकडे यांनी एकी केल्याचे दिसून येत आहे.
मागील पाच वर्षांच्या काळात गिरीश बापट आणि संजय काकडे यांनी मिळून दोन्ही पालिकेत भाजपची सत्ता आणली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी कोथरूड मतदार संघ निवडला. त्यामुळे सहाजिकच भाजपची पुण्यात ताकत वाढली. मात्र राज्यातील सत्ता गेल्यामुळे पुण्यात भाजपला पक्ष संघटन मजबूत करण्यात अडचणी येत आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यावर पूर्वी असलेले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित कऱण्यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत. सत्ता असल्यामुळे अजित पवारांना निर्णय घेणे सोपं होणार आहे. त्याचवेळी अजित पवार यांना आव्हान देण्यासाठी भाजपची दादा-भाऊ-नाना सज्ज असल्याचे दिसत आहे. खुद्द संजय काकडे यांनीच असा सूचक इशारा दिला आहे.
'यंग ब्रिगेड'ही देणार टक्कर
भाजपने जिल्ह्यात राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी दिग्गज नेत्यांसह यंग ब्रिगेडला संधी दिली आहे. पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे सोपविली आहे. तर महापौरपदी मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते धीरज घाटे आणि स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांना जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढताना भाजपच्या दादा-भाऊ-नाना यांच्यासह यंग ब्रिगेडचे देखील आव्हान असणार आहे.