पुणे - लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला पुण्यात धक्का बसला. पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहे. मविआकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वसंत मोरे यांना आहे. तत्पूर्वी वसंत मोरे यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली. यावेळी धंगेकरांनी वसंत मोरेंना शांतबुद्धीने विचार करून निर्णय घ्या असा सल्ला दिला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, आम्ही १५ वर्षापेक्षा जास्त एकत्र काम केले. ज्या कुटुंबापासून काम केले ते ठाकरे कुटुंब. मी वडिलकीच्या नात्याने त्यांना सल्ला दिला, जो काही निर्णय घ्यायचा तो शांतबुद्धीने घ्या. आज तुम्हाला अनेक पक्ष बोलवतील. पण तुम्हाला भविष्य कुठे दिसतंय, हे आणखी ४ लोकांचा सल्ला घ्या. स्वत:च्या मनाला विचारा आणि त्यापद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. शेवटी आम्ही एका परिवारात राहिलोय. आम्हाला चेहरा देण्याचं काम ठाकरेंनी केले. आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातले, राजसाहेबांनी आम्हाला ताटात जेवायला घातलंय. एवढा सन्मान दिला. त्यामुळे त्यांना विनंती केली तुम्ही मनसेवर टीका करू नका असं त्यांनी सांगितले.
तसेच आपण ज्या कुटुंबात असतो, तिथे चुका असतात. मी पक्ष सोडला तरी कधीही या घराण्यावर टीका केली नाही. लोक अनेक प्रश्न विचारतील, त्यामुळे आपण ज्या कुटुंबात राहिलो त्यावर टीका करू नका. थोडं थांबा. जो निर्णय घ्यायचा तो शांतपणे घ्या. जेणेकरून तुमचं भविष्य राहिले पाहिजे. आज सहा महिन्यापासून वसंतरावांचा खेळ सुरू आहे. आज तुम्हाला अनेकजण बोलवतील. तुम्हाला हे देऊ, ते देऊ सांगतात, पक्षात घेतल्यानंतर अनेकांना थप्पीला टाकलं आहे. त्या थप्पीत असे अडकले आहेत की त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे कुठल्या थप्पीत जाऊ नका. शांतबुद्धीने निर्णय घ्या असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, मी गटनेता असताना कधीही पुढच्या बाकावर बसलो नाही. वसंतरावांना पुढे बसायची खूप हौस होती. त्यांना पुढे बसवायचो. माझ्या इतर सहकाऱ्यांना बोलायला द्यायचो. निवडणूक सोपी आणि अवघडही नाही. हा खेळ मोठा आहे. डोकं शांत ठेवा, जोपर्यंत ते दुसऱ्या पक्षात जात नाही तोपर्यंत माध्यमे विचारत राहणार, एकदा तो कुठल्याही एका पक्षात गेला तर त्याला विचारणं बंद होईल. पक्षात गेल्यावर तो थप्पीला जाणार आहे असंही आमदार धंगेकर यांनी सांगितले.