हायकोर्टाचे ताशेरे : गोंगाट आटोक्यात ठेवा, नाचगाणे थांबवामुंबई : सणाचे पावित्र्य उरलेले नाही. ही जागा आता नाच-गाण्याने घेतली आहे. सण साजरा करणे, ही प्रथा आहे. मात्र अलीकडे सणांचे ‘इव्हेंटीकरण’ होत आहे. सेलीब्रिटी आणून त्यांचे शो करणे, लाऊडस्पीकर वाजवणे, हे तातडीने बंद करा. सार्वजनिक जागी सण साजरे करताना नाचगाणे थांबवा. वाहतुकीस अडथळा येतो आणि नागरिकांना नाहक त्रास होते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने छट पूजा आयोजित करण्यास परवानगी मागणाऱ्या संजय निरुपम यांच्या सांस्कृतिक मंडळाला फटकारले. त्यावर सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी आक्षेप घेतला. मंडळ वारंवार नियमांचे उल्लंघन करत आहे. त्याबद्दल त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मंडळाला पूजा आयोजित करण्याची परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद अॅड. नलावडे यांनी केला.खंडपीठानेही मंडळाच्या वर्तवणुकीवर बोट ठेवत चांगलेच फैलावर घेतले. ‘अलिकडे गणेशोत्सव असो किंवा नवरात्रौत्सव सगळेच सण हे गाजावाजा करून साजरे केले जातात. सणाचे पावित्र्य हरवले आहे. सेलिब्रिटी आणून त्यांना नाचगाणे करायला लावतात. सणांचा ‘इव्हेंट’ केलाय. सगळ्यांनाच क्रेडिट हवंय, प्रसिद्धी पाहिजे. सणाचे पावित्र्य आणि शुद्धता तशीच राहू द्या, ही आम्ही सर्वांना विनंती करतो. आम्हाला सण साजरे करण्यासाठी ‘नाही’ म्हणण्याची वेळ येऊन देऊ नका. नागरिकांना त्यांच्या धर्माचे अनुसरण करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही ते नाकारत नाही. त्यांनी शांतपणे आणि सौहादपूर्ण त्यांचा हक्क बजवावा. परंतु अशाप्रकारे नाचगाणे करून, अन्य नागरिकांना त्रास देऊन नव्हे,’ असे खंडपीठाने म्हटले.जुहू बीच सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी नाचगाणे करून अन्य नागरिकांना त्रास देणे योग्य नाही. लोकांनी येथे येऊन छट पूजा करावी पण आम्ही मंडळाला ती आयोजित करण्यास परवानगी देऊ शकत नाही. महापालिका आणि पोलीस येथे येणाऱ्या भाविकांची काळजी घेतील. त्यांना सुविधा पुरवतील. मंडळाने यंत्रणेला सहाय्य करावे, असे म्हणत खंडपीठाने मंडळाची याचिका फेटाळली. (प्रतिनिधी) छट पूजेसाठी मागितली होती परवानगीकाँग्रेसचे प्रवक्ते संजय निरुपम यांच्या भारती फ्रंट या छट पूजा साजरा करणाऱ्या मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा परवानगी नाकारल्याने मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती.मंडळाच्या म्हणण्यानुसार, यंदा १७ व १८ नोव्हेंबर रोजी छटपूजा आहे. छट पूजेला जुहू बीचवर सुमारे आठ ते दहा लाख भाविक जमा होतात.या भाविकांना सुरक्षा देणे, त्यांना खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करणे. त्याशिवाय शौचालयांची सुविधा मंडळ पुरवते. त्यामुळे या मंडळाला छट पूजा आयोजित करण्याची मुभा द्यावी.
सणांचे इव्हेंटीकरण थांबवा
By admin | Published: October 24, 2015 4:47 AM