लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला: लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप करीत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागृत राहून ‘फेक नॅरेटिव्ह’ ची पोलखोल करण्यासाठी समाजमाध्यमांवर सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणातील दीक्षान्त सभागृहात आयोजित भाजप जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
भाजप सत्तेत आली तर आरक्षण संपणार, असा खोटा नॅरेटिव्ह विरोधकांकडून पसरविण्यात आला असून, त्याचा दलित, आदिवासी समाजात परिणाम झाला आणि राज्यात भाजपला लोकसभेच्या कमी जागा मिळाल्या. मात्र जनाधार कमी झाला नसून, महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपला केवळ ०.३ टक्के (२ लाख) मते कमी मिळाल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थित होते.