ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 : ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात 250 मीटर लांबीचा ब्रेक चाचणी ट्रॅक नाही अशा राज्यभरातील सर्व सर्व कार्यालयातील वाहनांचे पासिंग ( योग्यता प्रमाणपत्र तपासणी ) बुधवारी सकाळी पासून बंद करण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश कार्यालयांमध्ये सकाळी अचानक ही सुविधा बंद करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यात पुणे, ठाणे ,पिंपरी-चिंचवड सह इतर ठिकाणी पासिंगसाठी आलेली हजारो वाहने माघारी घेऊन जाण्याची वेळ वाहनधारकांवर आली. दरम्यान, ही तपासणी येत्या 29 आॅगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश असून त्यामुळे राज्यातील लाखो वाहने पासिंग अभावी एकाच जागी उभी राहणार आहेत. त्यात प्रवासी वाहनांसह अनेक मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे.
वाहनांची योग्यप्रकारे चाचणी न करता फिटनेस तसेच ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट आरटीओकडून दिली जाते. त्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाला वाहनांची योग्यप्रकारे चाचणी घेऊनच फिटनेस व ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट देण्याचा आदेश द्यावा, यासाठी पुण्याच्या श्रीकांत कर्वे यांनी अँड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सध्या सुरू आहे.
या सुनावणी दरम्यान, सहा महिन्याच्या आत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये हे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने एका महिन्याच्या आत हमीपत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार,राज्यात ज्या ठिकाणी असे टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाहित त्या ठिकाणचे सर्व योग्यता प्रमाणपत्रांचे पासिंग तातडीने थांबविण्याचे आदेश मंगळवारी सकाळी परिवहन उपायुक्त अ.न भालचंद्र यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. मात्र, राज्यातील बहुतांश कार्यालयांमध्ये हा टेस्ट ट्रॅकच नसल्याने सर्व ठिकाणचे पासिंग बंद राहणार आहे. पुणे -पिंपरींत गोंधळपरिवहन आयुक्तांकडून आज सकाळी हे आदेश तातडीने काढण्यात आले. त्यामुळे सकाळी पासिंग सुरू होताच ते बंद करण्यात आले. मात्र, पासिंग बंद करण़्यात येणार असल्याची कोणतीही कल्पना नसल्याने पासिंगसाठी आलेल्या वाहनधारकांची चांगलीच तारंबळ उडाली. अचानक पासिंग होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने या वाहनधारकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर वरिष्ट अधिका-यांनी या आदेशाची माहिती देत 29 आॅगस्ट पर्यंत कोणतेही पासिंग होणार नसल्याचे स्पष्ट केले.