खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील खर्डा पंचक्रोशीतील श्रद्धास्थान ह.भ.प. संत सद्गुरु सीताराम महाराज उंडेगावकर यांचे पार्थिव पुणे येथून ताब्यात मिळण्यास झालेल्या विलंबाच्या निषेधार्थ भाविकांनी रविवारी शिर्डी-हैदराबाद राज्यमार्ग चार तास रोखून धरला. उंडेगावकर महाराजांचे शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांचा समाधी सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पार्थिव ताब्यात मिळण्यास विलंब होत असल्याने भाविकांनी खर्डा येथे शिर्डी-हैदराबाद राज्यमार्गावर रास्ता रोको केला.उंडेगावकर महाराजांचा समाधी सोहळा आमच्या भागात करावा, अशी भूमिका खर्डा व उंडेगाव (जि. उस्मानाबाद) येथील भाविकांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे सध्या भावनिक वाद निर्माण झाला आहे. खर्डा येथे समाधी सोहळ्याची न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर तयारीही केली आहे. महाराजांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविकांची रविवारी खर्ड्याकडे रीघ लागली होती. सीताराम गडाचे भाविकांच्या माध्यमातून ५ कोटींचे बांधकाम प्रस्तावित असून, या कामाला प्रारंभही झाला आहे. खर्डा येथील दानशुरांनी गडासाठी जमीनही दान दिली. त्यामुळे येथे भव्य सीताराम गड उभारले जाणार आहे. याच गडाच्या ठिकाणी समाधी सोहळा व्हावा, अशी इच्छा बाबांनी व्यक्त केली होती. त्यामुळे भाविकांनी देणगी देऊन गडाचे बांधकाम सुरू केले. जामखेडचे तहसीलदार प्रदीप कुलकर्णी, कर्जत-जामखेडचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तुमच्या भावना वरिष्ठांना कळवितो. न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर भाविक शांत झाले. खर्डा गावात रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंद पाळून बाबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (वार्ताहर)
उंडेगावकर महाराजांच्या भक्तांचा रास्ता रोको
By admin | Published: September 01, 2014 1:51 AM