- संतोष वानखडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 29 - खासगी अनुदानित शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत दिरंगाई आणणा-या मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी काढले आहेत.
वाशिम जिल्ह्यात एकूण १९९ खासगी माध्यमिक शाळा आहे. सन २०१३-१४ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात ४६ शिक्षक अतिरिक्त आहेत. या शिक्षकांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही समायोजन प्रक्रियेला सुरूवात होऊ शकली नाही. दरम्यान, २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार किती शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, याबाबतची माहिती शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांकडून मागितली आहे. सदर माहिती आॅनलाईन पद्धतीने सादर करावी लागणार आहे. ही माहिती राज्याच्या शिक्षण विभागाकडे सादर केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही ‘आॅनलाईन’द्वारेच होणार आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील अनेक शाळांनी अद्याप आॅनलाईन माहिती सादर न केल्याने समायोजनाच्या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झाला. माहिती सादर करण्याबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही काही शाळांच्या मुख्याध्यापकांचे दिरंगाई धोरण कायम आहे. या पृष्ठभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी माहिती सादर न करणाºया मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याचे आदेश काढले आहे.