आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 10:26 AM2019-12-06T10:26:22+5:302019-12-06T10:27:04+5:30
फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आणीबाणीतील कैद्यांना निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात आली होती. सरकारी निधीचा एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उपयोग का, असा सवाल करत काँग्रेसनेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी हे निवृत्तीवेतन थांबविण्याची मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली आहे.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात आणीबाणी लागू केल्यानंतर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला होता. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. भाजप सत्तेवर आल्यानंतर या कैद्यांना भाजप सरकारकडून दरमहा पाच ते 10 हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करण्यात आले होते. फडणवीस सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार करून हे थांबवा अशी मागणी करणारे पत्र नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.