पुणे : राजकारणी साहित्यिक नसतात, या म्हणण्यात काही अर्थ नाही. राजकारण्यांना साहित्यिक म्हणून नाकारणे, ही दुर्गा भागवतांपासून सुरू झालेली परंपरा थांबवायला पाहिजे, असे स्पष्ट मत वात्रटिकाकार आणि १५व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. समाजातील स्थित्यंतराविषयी साहित्यिकांना जाण आणि भान असावे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित १५व्या साहित्यिक कलावंत संमेलनाला शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. फुटाणे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, आदी या वेळी उपस्थित होते.फुटाणे म्हणाले, सोशल मीडियामुळे आजच्या काळातील पिढीची उंची वाढली आहे, पण साहित्यिक यापासून फार दूर आहेत. साहित्यिकांची आणि श्रीमंतांची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत आहेत. गरीबांची मुले जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकत असल्याने मराठी जगविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली आहे. सद्यस्थिती पाहता वाचन संस्कृतीला प्रेरणा देण्यासाठी कलावंत साहित्यिकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. साहित्यिकांना सामाजिक भान असावे, हा मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. अशी मदत किती साहित्यिकांनी केली?
‘राजकारण्यांना साहित्यिक म्हणून नाकारणे थांबवा’
By admin | Published: December 26, 2015 1:26 AM