- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोपीचा कबुलीजबाब नोंदवून, दोषारोपपत्राला जोडण्याचा प्रकार अनेक पोलीस ठाण्यांत सर्रासपणे चालत असल्याने, उच्च न्यायालयाने ही ‘बेकायदा प्रथा’ बंद करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. एका महिन्यात मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना लेखी स्वरूपात आदेश देण्याचा निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.फेब्रुवारी २०१५मध्ये फहिम अन्सारीची बाइक स्टेशनरी कारवर आदळली. कार मालकाने आणि अन्सारीने प्रकरण आपापसांत सोडवल्याने, अन्सारीने एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. अन्सारीच्या म्हणण्यानुसार, बाइकच्या धडकेमुळे अन्सारीच जखमी झाला व स्टेशनरी कार डॅमेज झाली. कार मालकाने याबाबत एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांत अन्सारीचा कबुलीजबाब होता. यात त्याने गुन्हा मान्य केला होता. ‘अशा प्रकारे आरोपीचा कबुलीजबाब नोंदवणे बेकायदा आहे. फौजदारी दंडसंहितेनुसार (सीआरपीसी) पोलीस आरोपीला कबुलीजबाबावर सही करण्यास किंवा अंगठा लावण्यास भाग पाडू शकत नाही. त्यामुळे ही बेकायदा प्रथा बंद करा’, असे निर्देश न्यायालयाने दिले.