सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्यातील २६ गावांतील शेतकऱ्यांनी टेंभू योजनेतून व नीरा उजवा कालव्यांतर्गत फाटा क्र.५ मधून माण नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत, म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून बंधारे भरून द्यावेत, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन हक्काचे व कायमस्वरूपी पाणी द्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी मिरज रेल्वे गेटवर रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाला सांगोला शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून पाठिंंबा दिला. रस्ता रोकोमुळे मिरज-सांगोला रोडवरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी आमदार डॉ. गणपतराव देशमुख आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी आले असता, आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी त्यांना काहीच न बोलू दिले नाही. पाणीप्रश्नावर आपणाला बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात त्यांना देशमुखांना विरोध केला़ त्यानंतर, आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून देशमुखांनी काढता पाय घेतला. (वार्ताहर)
पाण्यासाठी २६ गावांचा रस्ता रोको
By admin | Published: October 22, 2016 11:33 PM