लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/बुलडाणा/वाशिम : शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करुन दूध रस्त्यावर ओतून दिले तसेच भाजीपाला रस्त्यावर फेकला. व्यापाऱ्यांनीही प्रतिष्ठाने बंद ठेवून संपाला पाठिंबा दर्शविला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. बुलडाणा आगाराने सकाळी एकही बस सोडली नाही.अकोला जिल्ह्यात गांधीग्राम, वल्लभनगर, बाभूळगाव जहागीरसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बाळापूर तालुक्यात व्याळा, वाडेगाव व पारस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारस येथे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. व्याळा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा दिला. रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ७९ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यातही अनेक ठिकाणी रास्ता रोको करुन शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. मूर्तिजापूर येथे उद्या होणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषी प्रतिष्ठान संचालकांनी या बंदला पाठिंबा दर्शविला. वाशिम जिल्ह्यात रिसोड येथे लोणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी संपाच्या समर्थनार्थ रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिरपूर येथे ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले. यावेळी हनुमानाच्या मुर्तीला दूग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खाऊ घातला. मानोरा, मालेगाव तसेच मंगरूळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्हाभर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगाराने बसेस बंद ठेवल्या होत्या. दुपारनंतर मात्र बसेस सोडण्यात आल्या. देऊळगावराजा आणि देऊळगावमही येथील व्यपाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपला सहभाग नोदविला. खामगाव, मलकापूर, चिखली, नांदुरा, मेहकर आदी तालुक्यातही अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. हे आंदोलन शांततेत पार पडले.प्रवाशांना फटकाएस.टी. महामंडळाने सोमवारचा बंद लक्षात घेऊन सकाळी बसेस न सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबात कुठलीही पूर्वसूचन नसलेल्या प्रवाशांना मात्र ताटकळत बसावे लागले. बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी एक वाजेनंतर पोलीस बंदोबस्तात बुलडाणा आगाराने बस सेवा सुरु केली.