स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचं चित्रीकरण थांबवा, शिवसेनेच्या मागणीवर अमोल कोल्हे म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 02:29 PM2020-02-22T14:29:13+5:302020-02-22T14:31:30+5:30
Swarajya Rakshak Sambhaji: मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल
मुंबई - झी मराठीवरीलस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील चित्रीकरण थांबवावं, संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि झी मराठीला विनंती करणार आहे असं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले होते. त्यावरुन मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक संभाजी मालिका गेली अडीच वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल, मालिकेत बदल केल्याबाबत जे वृत्त छापलं ते धादांत खोटं आहे. आवश्यक खबरदारी घेऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे. कोणताही भाग वगळावा अन्यथा नाही तो अधिकार निर्मात्याचा नाही तर झी मराठी वाहिनीचा आहे असं स्पष्टीकरण डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते अर्जुन खोतकर?
इतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही हे खरं आहे. संभाजी महाराजांचे हाल कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे काही जण यातून खुरापती काढून राज्यातील वातावरण बिघडवू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती, त्यातून काही प्रसंग निर्माण होणार असतील तर त्याची खबरदारी वेळीच घेतली पाहिजे असं अर्जुन खोतकर म्हणाले होते. संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे अशी मागणी त्यांनी केली होती.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये शरद पवारांच्या दबावामुळे ही मालिका बंद होतेय असं म्हटलं होतं. मात्र याबाबत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणात शरद पवारांना गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असं त्यांनी म्हटलं होतं.