कामशेत : मागील काही महिन्यांपूर्वी मावळात चोरांचा सुळसुळात झाला असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. याच बरोबर तीन हजार चोरांची टोळी आहे. त्यांच्या अंगाला काळे आॅईल फासले आहे, अंगात चड्डी बनियन असून पाठीवरची बॅग आहे, आदी अफवांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिक दहशतीत होते. पण, या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. काही दिवसांपासून चोर आल्याच्या अफवाही थंडावल्या आहेत.बहुतेक गावातील गस्त थांबले असून नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.मावळातील बहुतांश भागांमध्ये अज्ञात चोरांची दहशत निर्माण झाली होती. त्यात भर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप ग्रुपवर अनेक जागरूक तरुण अमुक ठिकाणी चोर आलेत, तमुक ठिकाणी चोर पकडला, चोरांनी अंगाला काळे आॅइल लावले आहे, जागते राहो सारखे मेसेज फिरवत होते. चोरांचा माग काढण्यासाठी त्याचा फायदा होत होता. पण प्रत्यक्षात चोर काही केल्या सापडत नव्हते.चोरांच्या भितीमुळे रात्रीचे लोक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनातही भीती निर्माण झाल्याने ते रात्री उशिरा घरी न येता कंपनीतच झोपत होती. पोलीस यंत्रणा फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप अनेकांनी केले. आमच्या भागात चोर आले आहेत हे सांगूनही पोलीस येत नसल्याची तक्रार नागरिक करीत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी चोर आल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे नागरिकांना आवाहन केले होते. चोर अस्तित्वातच नाही तर भेटणार कसे? हे माहित असूनही पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन आलेल्या तक्रारीनुसार चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. शोध घेतला. पण, चोर सापडले नाहीत की घरी चोरीच्या तक्रारींची नोंद झाली नाही. खरंच अज्ञात टोळी सक्रिय झाली आहे का? कामशेतमध्ये मोठ्या संख्येने चोर दाखल झाले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे नव्हती. मात्र, आता अनेकांना उत्तरे मिळाली आहेत. त्या अफवा होत्या हे सर्वजण मान्य करायला लागले आहेत. सोशल मिडीयावर किती विश्वास ठेवावा अथवा ठेऊ नये हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. (वार्ताहर)>घरोघरी व्हायची चर्चा : पोलीस यंत्रणेची धावपळमावळात त्यावेळी घरोघरी व चौकाचौकात चोरांचीच चर्चा सुरु होती. कामशेतसह नाणे, पवन, आंदर व आजूबाजूंच्या गावांमध्ये गस्त घालण्यास प्रारंभ झाला होता. प्रत्येकाच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हातात बॅटरी असल्याचे चित्र अनेक गावात दिसत होते. ‘चोर आला...चोर आला...’ म्हणत अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडत होते. शिट्या व लोखंडी दांडक्यांचे आवाज जागो जागी घुमत होते. ठराविक माणसांचा गट बनून रोजच्या रोज रात्री गस्त घातली जात होती. यात नोकरदार वगार्ची मोठी गोची होत होती. रात्रभर जागून सकाळी कामाला जावे लागत असल्याने सर्व जण हैराण झाले होते. घरातील महिला वर्गानेही चोरांचा धसका घेतला होता. महिलांचे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील झाले होते. मावळातील महत्वाच्या शहरांप्रमाणे अनेक गावातील भागातील लोक पोलीस ठाण्याकडे धाव घेत होते. चोरांना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणाही कमी पडत होती. प्रत्येकाच्या तक्रारीवर एक एक पोलीस धाडता धाडता शेवटी पोलीस ठाण्यातही पोलीस शिल्लक राहत नव्हते. या काळात पोलिसांची मोठी धावपळ होत होती, प्रत्येकजण मी चोर पहिला आहे असे सांगत होता, पण त्या चोराचे वर्णन सांगणे त्यांना जमत नवते. यामुळेच चोर आल्याच्या घटनांवर विश्वास ठेवणे अवघड जात होते. या काळात अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या दरवाजा पाशी लाकडी दांडके, लोखंडी रॉड व इतर हत्यारे बचावासाठी ठेवली होती.
चोर आल्याच्या अफवा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 2:10 AM