नागपूर : एकीकडे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण महागले आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाचा व्यापार थांबविण्याची मागणी विधानसभेत दोन दिवसीय चर्चेदरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी केली. नियम २९३ अन्वये योगेश सागर यांनी हा प्रस्ताव सादर केला. सुनील प्रभू यांनी शिक्षण क्षेत्र भांडवलदारांचा अड्डा झाल्याचे सांगत त्यावर सरकारचे नियंत्रण असावे, अशी मागणी केली. डी.पी. सावंत यांनी आरटीईची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. अॅड. पराग अळवणी यांनी दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर एका वर्गात ३० ते ३५ विद्यार्थी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रचलित शिक्षण पद्धत आमूलाग्र बदलण्याची, डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा येथे महिला विद्यापीठाची, राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुणवत्तेवर आधारित शिक्षणाची गरज व्यक्त केली. राजभाऊ वाजे यांनी शिक्षणसम्राट मोठे भूखंड घेऊन बसल्याचा आरोप केला. संजय केळकर व मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाच ओळीत सांगितला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अबू आझमी यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना शासकीय शाळेत शिकण्याची सक्ती करण्याची मागणी केली. आसीफ शेख यांनी उर्दू शाळा उघडण्याची मागणी केली. माधुरी मिसाळ यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी केली. मेघा कुळकर्णी यांनी शालेय शिक्षणात कला, क्रीडा व संगीताला प्राधान्य देण्याची तर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा येथे मंजूर कम्युनिटी कॉलेज तातडीने उभारण्याची मागणी केली. शिक्षक मतदार संघ रद्द करून अंगणवाडी सेविकांना प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली.
शिक्षणाचा व्यापार थांबवा, दर्जा सुधारा
By admin | Published: December 18, 2014 5:22 AM