लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य प्रदेश येथील मंदसौर येथे शेतकऱ्यांवरील अत्याचार आणि राज्यातील शेतकरी संपाबाबत सरकारची भूमिका याचा निषेध करण्यासाठी घाटकोपर युथ काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी घाटकोपर स्थानकात फलाट क्रमांक दोनवर रेल रोको करण्याचा प्रयत्न युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.घाटकोपर स्थानकात फलाट क्रमांक दोनवर गुरुवारी दुपारी १.४५ वाजता रेल रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सीएसटीला जाणारी लोकल फलाटावर येताच १५-२० आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी व फलक दाखवत लोकलसमोर उड्या घेत रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी काही मिनिटांत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, स्थानकात अचानक झालेल्या घोषणाबाजी, आंदोलनकर्ते आणि पोलिसांच्या झटापटीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.आंदोलनाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे आरपीएफ (४ अधिकाऱ्यांसह २१ कर्मचारी) आणि जीआरपीचा (४० अधिकारी-कर्मचारी) फौजफाटा घाटकोपर रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला होता. स्थानकाच्या पूर्व व पश्चिम दिशेसह फलाटावरदेखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. परिणामी आंदोलनाचा रेल्वे सेवेला फटका बसला नाही. आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी दिली. >१३ आंदोलनकर्त्यांना १७४/१, १४७, १४६, १४५ रेल्वे कायद्यानुसार अटक करून रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले होते. घाटकोपर युवा अध्यक्ष सुधांशू भट्टच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना १९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारून न्यायालयाने जामीन मंजूर केला.
घाटकोपर येथे रेल रोको
By admin | Published: June 09, 2017 2:17 AM