मुंबई : आरामनगर, वर्सोवा मुंबई येथील म्हाडाच्या नागरी वसाहतीमध्ये झालेल्या ३५४ अनधिकृत मिळकती निष्कासित करण्याची कारवाई सुरू झाल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या अनधिकृत मिळकतीमध्ये जर डान्सबार सुरू असतील तर त्याबाबत माहिती घेऊन ते बंद करण्याचे आदेशही दिले जातील, असे त्यांनी सांगितले.आरामनगर, वर्सोवा येथील निवासी गाळ्यात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात केली होती, त्यावर मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. म्हाडा वसाहतीतील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात झाली तेव्हा २०० मिळकतधारक न्यायालयात गेले. त्यांनी स्थगिती मिळविली. ७१ मिळकतधारकांवर कारवाई करण्यात आली. ज्यांनी स्थगिती मिळविली आहे. ती उठविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेस देण्यात येतील, असे पाटील म्हणाले. या परिसरात विनापरवाना डान्सबार सुरू असून ते पाडायला काय हरकत आहे, अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याबाबत आजच्या आज माहिती घेऊन डान्सबार बंद करण्याची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
म्हाडा वसाहतीतील अनधिकृत धंदे बंद करणार
By admin | Published: August 04, 2016 4:42 AM