- सुशांत मोरे, मुंबई लोकल डब्यातील आसने आधीच आरक्षित करुन अन्य प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्यांना आळा घालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) घेण्यात आला आहे. यासाठी एक विशेष प्लॅनिंग आरपीएफकडून तयार करण्यात आले असून २५ आरपीएफ जवान काही स्थानकांवर तैनात केले जाणार आहेत. त्याची १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी केली जाईल, अशी माहीती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा (पश्चिम रेल्वे-मुंबई) यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये काही प्रवासी आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींसाठी जागा अडवून ठेवतात. अन्य प्रवाशाने त्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केल्यास वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्याचे रुपांतर काही वेळा हाणामारीतही होेते. या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वे आरपीएफकडे बऱ्याच तक्रारी दाखल होत आहेत. त्याविरोधात कारवाईही करण्यात येते. या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. यासाठी पश्चिम रेल्वे आरपीएफतर्फे २५आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत. वांद्रे, अंधेरी, बोरीवली, विरार स्थानकांवर गर्दीच्या वेळेत हे जवान तैनात असतील. यातील काही जवान हे साध्या वेषात तैनात असणार आहेत. काही जवान लोकलमधून या स्थानकादरम्यान प्रवासही करणार आहेत. विरार ते बोरीवली स्थानकादरम्यान आरपीएफच्या जवानांची नजर राहणार आहे. या जवानांमध्ये काही महिला जवानही असणार आहेत. डब्यातील दबंगिरी वाढली असून त्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे याविरोधात कारवाई करण्यासाठी हे पथक तैनात केले जाईल. १ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त लोकल आनंद झा यांनी सांगितले.
‘आरक्षित आसनांच्या’ दबंगिरीला बसणार आळा
By admin | Published: August 27, 2015 4:38 AM