भिगवण : बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे, या मागणीसाठी जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या परिसरातील शेतकरी या उपोषणाला पाठिंबा देऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवीत आहेत.सध्या उजनीच्या काठावरील गावांनादेखील या संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बिल्ट पेपर आणि विटांच्या कारखान्याला मात्र २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, कंपनीने या दुष्काळी परिस्थितीत तीन महिने पुरेल एवढा मोठा पाणीसाठा करून ठेवला आहे. पाणीसाठा असताना कंपनी लाखो लिटर पाणी उजनीतून उपसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. माणसांना, जनावरांना पिण्यचे पाणी मिळत नसताना कंपनी कागद आणि विटा तयार करण्यासाठी मुबलक पाण्याचा वापर करीत असल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी असेल, तर ती पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून अधिग्रहण केली जाते; परंतु बिल्ट कंपनीबाबत मात्र हा निकष लावला जात नाही. तसेच, कंपनीला वाचविण्यासाठी उजनीचे अधिकारी मात्र उजनीमध्ये तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगतात. यामुळे ज्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी उजनीसाठी गेल्या, असे शेतकरी पाण्यावाचून उपाशी आणि बिल्ट कंपनी तुपाशी, अशी परिस्थिती सध्या तरी आहे. यासाठी काही शेतकरी आणि जनजागृतीचे संजय चांदू भोसले आणि गणेश विलास देवकाते यांनी कंपनीच्या गेटसमोर सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. भोसले व देवकाते यांनी कंपनीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा, अशी मागणी केली आहे.>जुने कारखाने : बंद करता येत नाहीसध्या उजनी धरणात पाऊस नाही पडला, तरी तीन वर्षे पिण्यासाठी पाणीसाठा असल्याचे सांगून शासन निर्णयानुसार १० वर्षांपूर्वीच्या कोणत्याही कारखान्याचे पाणी बंद करू नये, असा आदेश आहे. - राजेंद्र गायकवाड , उपअभियंता,उजनी धरण
‘बिल्ट’चा पाणीपुरवठा बंद करा!
By admin | Published: May 21, 2016 1:08 AM