ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - उरण येथे एका खाजगी बंदरातील प्रशासनाविरोधात कंटेनर चालकांनी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला होता. संपाने बेजार झालेल्या कंटेनर चालकांची पोलिसांशी शाब्दिक चकमक उडाल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले. प्रत्यक्षदर्शी आणि शिपिंग कंपनीच्या काही एजंटनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चालकांना मारहाण सुरु केल्यावर कंटेनर चालकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली.
पोलिसांनी अधिक पोलीस दल मागवल्याचे लक्षात आल्यावर पोर्ट युजर या इमारतीजवळ पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यात अडथळे यावेत म्हणून लाकडे व टायर भर रस्त्यात जाळण्यात आले. अतिरिक्त पोलीस कुमक पोहचण्यास उशिर झाल्याने संतप्त जमावाने दगडफेक करत घटनास्थळापासून पोबारा केला. मात्र पोलिसांनी शोध मोहीम हाती घेत काही कंटेनर चालकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमध्ये काही पोलीस कर्मचारी आणि कंटेनरचालक जखमी झाल्याचे पोलीस अधीक्षक शशीकांत बोराटे यांनी सांगितले आहे.