अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- डहाणू नरपड आंबेवाडी येथे सुरू असलेले अनिधकृत बांधकाम ग्रामस्थांनी हाणून पाडले असून, आगामी काळात या विरोधात लढा उभारण्याची तयारी दर्शविली आहे. तालुक्यातील किनारी भागात हॉटेल व्यवसाय आणि सेकंड होमच्या नावाखाली अनिधकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. समुद्र अधिनियम कायद्याचे खुलेआम उलंघन रोखण्यासाठी डहाणूतील प्रशासन हतबल ठरल्याने ग्रामस्थांना रौद्रवतार धारण करावा लागला आहे.समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीला सोन्याचा भाव आहे. या जमिनी गिळंकृत करण्यासाठी शहरातील धनदांडगे आणि हॉटेल व्यावसायिक सरसावले आहेत. दलालांच्या मदतीने डहाणू तालुक्यातील किनारी भागातील स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून जमिनी बळकावल्या जात आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी न घेता समुद्रअधिनियम कायद्याने संरक्षित जमिनीवर सरसकट अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. या करिता शासनातील अधिकारी आणि राजकीय पुढारी छुप्यारीतीने सहकार्य करीत असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे. नरपड, चिखले आणि घोलवड गावात उच्चतम भरती रेषेलगत होणारी अनिधकृत बांधकामं रोखण्यासाठी डहाणूतील प्रशासन चालढकल करीत आहे. तर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकारणाचा डोळेझाकपणा पर्यावरणाच्या मुळाशी उठला आहे. या बाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरोधी कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.दरम्यान मंगळवार, १ नोव्हेंबर रोजी नरपड ग्रामपंचायतीअंतर्गत डहाणू बोर्डी मार्गालगत सर्व्हे नंबर ५/१/४ आंबेवाडी येथील सुरू असलेले बांधकाम ग्रामस्थांनी हाणून पाडले आहे. या बांधकामाकरिता जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. बांधकामाकरिता खोदलेल्या आठ ते दहा फुट खोलीच्या खड्ड्यांमध्ये समुद्राचे पाणी जमा झाले होते. त्यामुळे अशी बांधकामे केवळ समुद्री पर्यावरण आणि जैवविविधतेला मारक नाहीत. तर येथील हिरवापट्टा नाहीसा झाल्यास शेती व बागायतीला धोका निर्माण होऊन शकतो. त्यामुळे अनधिकृत बांधकामं थांबली नाहीत, तर या विरोधात लढा उभारण्याची तयारी भूमिपुत्रांनी दर्शविली आहे.