जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत
अलिबाग,दि.17- वादळी वा-याने कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किनार्यावरील निवाराशेड उडून गेली आहे. आतापर्यंत करोडो रुपयांच्या नुकसानीचा फटका रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसला आहे. खोल समुद्रातून मासेमारी करुन परतत असताना अनेक मच्छीमार नौका समुद्रात भरकटल्या असून काही मच्छीमारांची जाळी समुद्रात वाहून गेले आहेत. अलिबाग कोळीवाड्यातील नाखवा यांची छोटी मासेमारी नौका या वादळाच्या तडाख्यात फुटली आहे.
48 तासात वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा इशारा शुक्रवारी हवामान विभागाने दिला होता. रात्रीपासूनच विजांच्या गडगडासह पावसाला सुरूवात झाली होती. शनिवारी सकाळी 10 वाजल्यानंतर वार्याचा वेग वाढला. याचा फटका मोरा बंदर, मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, साखर-आक्षी, ताराबंदर, एकदरा, खोरा बंदर, आगरदांडा, जिवनाबंदर या ठिकाणच्या मच्छीमारांना जबरदस्त बसला. लाटांच्या तडाख्याने बंदरात नांगरुन ठेवलेल्या मच्छीमारी नौका भरकटल्या आहेत.
दरम्यान, या वादळीसदृश्य परिस्थितीत कोणीही मच्छीमार समुद्रात बेपत्ता झालेला नसल्याची माहिती मच्छीमारी संस्थांकडून देण्यात येत आहे.
अलिबाग समुद्र किनार्यावरील निवारा शेड वार्याने उडून गेल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी हजर राहून तिच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. दुपारी 12.30 वाजता अग्नीशमन दलाच्या मदतीने निवारा शेडवरील ताडपत्री पुन्हा टाकण्याचे काम सुरू झाले होते. या सर्व घटनेवर अलिबाग नगरपालिका प्रशासन देखरेख करीत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.