मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपणार असल्याने हातात असलेल्या शनिवारसह रविवारी मुंबई शहर आणि उपनगरातील पाच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांवर तोंडसुख घेत प्रचार शिगेला पोहचविला. विशेषत: सकाळच्या प्रचार फेऱ्यांनी निवडणुकीत आणखी जीव आणला आणि सूर्यास्तापर्यंत सुरु राहिलेल्या दिग्गजांच्या सभांनी तर यात भर घातल्याने रविवार प्रचाराने रंगून गेला.गेल्या दहा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार फेऱ्यांसह सभांनी मुंबई शहर आणि उपनगर दणाणून गेले. विशेषत: शहरातील दहा विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत उपनगरातील २६ विधानसभा मतदार संघातील प्रचारफेरी आणि सभांनी झंझावती प्रचार झाला आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता या प्रचार आणि प्रसाराचा शेवट होत असल्याने रविवारी राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांचा समाचार घेतला. विशेषत गिरगावात सायंकाळी झालेल्या मनसेच्या सभेदरम्यान राज आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेदरम्यान उद्धव यांनी भाजपावर तोंड सुख घेतले.रविवारी सकाळी दिंडोशी येथे काँग्रेसचे उमेदवार राजहंस सिंह यांच्या प्रचारात उतरलेले माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, विलेपार्ले येथे काँग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे यांच्या प्रचारात उतरलेले बॉलीवूड कलाकार शक्ती कपूर, वरळी मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन अहिर यांच्या प्रचारत उतरलेल्या बॉलीवूडच्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर; अशा अनेकांनी प्रचारात रंगत आणली. दरम्यान, दुपारी मात्र पडलेल्या कडक ऊन्हाने पुन्हा प्रचार क्षीण झाला. आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांत प्रचारात सहभागी झालेल्या व दमलेल्या कार्यकर्त्यांनी पुलाव आणि वडापाववर ताव मारला.सायंकाळी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा असल्याने या तिन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा सभा ठिकाणी रवाना झाला. दरम्यानच्या काळात दुपारभर प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. यामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा मोठया प्रमाणावर समावेश असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
शहरात प्रचाराचा झंझावात
By admin | Published: October 13, 2014 5:30 AM