अकोला - ट्रक व दुचाकी यांच्यातील अपघातावरून भांडपुरा पोलीस चौकीसमोर दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही गटांकडून दगडफेक सुरू असताना हाकेच्या अंतरावर असलेले डाबकी रोड ठाण्याचे पोलीस तब्बल एक तासाने पोहोचले. तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डाबकी रोडवरील रहिवासी मंगेश महादेव साबे व राहुल तुळशीराम मुद्गल हे दोघे एमएच ३0 एसी ७१६९ क्रमांकाच्या दुचाकीने भांडपुरा पोलीस चौकीसमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला सैयद आसिफ सैयद नूर याच्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघेही खाली कोसळले तसेच दुचाकीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताच्या कारणावरून भांडपुरा चौकातील दोन भिन्न समाजातील गट समोरासमोर आले. ट्रकचालकाला यासंदर्भात विचारणा करताच अचानक दगडफेक करण्यात आली. एका गटाकडून दगडफेक सुरू होताच भांडपुर्यातील दुसर्या गटानेही तुफान दगडफेक केली. त्यामुळे भांडपुरा पोलीस चौकी ते बाळापूर मार्गावर प्रचंड दगड पसरले होते. हा प्रकार होत असताना डाबकी रोड किंवा शहरातील कुठलेही पोलीस तब्बल तासभर न आल्याने दगडफेक सुरूच होती. त्यामुळे दुचाकीसह काही वाहनांचे नुकसान झाले. या दगडफेकीत सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही; मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. एक तास उशिराने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले ताफ्यासह घटनस्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षकांनी भांडपुरा परिसरात घरांची झडती घेऊन आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रामेश्वर कथलकर यांच्या फिर्यादीवरून डाबकी रोड पोलिसांनी ट्रकचालक सैयद आसिफ सैयद मनसूर याच्यासह १५ ते २0 जणांविरुद्ध, तर मंगेश महादेवराव सांगे, राहुल तुळशीराम मुद्गल याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. या तिघांनाही अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
भांडपु-यात तुफान दगडफेक
By admin | Published: April 23, 2015 2:19 AM