नेरळ : पावसाच्या संततधारेमुळे नेरळ बाजारपेठेतील रस्ते पाण्याने भरून वाहत होते. जयहिंद नाक्यावरील चार दुकानांत पाणी शिरले. त्याचवेळी माथेरान मिनीट्रेनच्या नेरळ लोकोमध्ये सर्वत्र पाणी साचले होते, तर मिनीट्रेन थांबते ते तिन्ही फलाट पावसाच्या पाण्यात बुडून गेले होते. नेरळ पाडा भागातील नाल्यात सर्व परिसरातील पाणी वाहून येत असल्याने ते सर्व पाणी पुढे माथेरान मिनीट्रेन थांबते त्या स्टेशन भागात साचले होते. >अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसाननांदगाव/ मुरुड : मुरु ड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून, भातशेतीचे नुकसान झाले आहे. ३,९०० हेक्टर जमिनीत भातशेतीचे पीक पूर्ण तालुक्यातून घेतले जाते. पावसामुळे भात रोपे कुजली आहेत. शासनाने आता वाट न बघता शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुरु ड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक फैरोझ घलटे यांनी के ली आहे. मुरु ड तालुक्यात रविवारी १८९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून, पाण्याखाली सर्व शेती गेली आहे. मुअज्जम महाडीक यांची दीड एकर शेती, विलास दगडू पाटील यांची चार एकर शेती व हमीद हाल्डे अशा अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या आदांड, उसरोळी, नांदगाव वाळवंट, खारदोडकुले आदी भागात मोठे नुकसान झाले असल्याचे यावेळी फैरोझ घलटे यांनी सांगितले.>चौल -रेवदंड्यात जनजीवन विस्कळीतरेवदंडा: गेले दोन दिवस मुसळधार पावसाने चौल -रेवदंडा परिसराला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. शाळेतील उपस्थिती घटलेली जाणवत आहे. अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून सखल भागात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आहेत. या पावसामुळे सुपारी पिकाला धोका निर्माण झाला आहे.>संततधर पावसामुळे भातशेती धोक्यातकार्लेखिंड : अलिबाग तालुक्यात पावसाने गेल्या तीन दिवसात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे भातरोपे वाहून जाणे व कुजण्याच्या स्थितीत आहेत. यावर्षी सुरुवातीलाच पहिली पेरणी केलेली बियाणे रुजले नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली परंतु अतिपावसामुळे ती सुद्धा व्यवस्थित रुजली नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आहे त्या रोपांमध्ये लावणी उरकली आहे. अलिबागमध्ये ९५ टक्के लावणी झाली आहे.>अंबा नदी तुडुंबनागोठणे : रविवार दुपारपासून संततधार पडणाऱ्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नसल्याने अंबा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पुराचे पाणी शहरात भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले आहे. >रस्त्यावर पाणीच पाणीश्रीवर्धन : तालुक्याला पावसाने झोडपल्याने नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खलाटीत पाणी साचल्याने शेती पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. >तळ्यात वाहतूक ठप्पतळा : धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वरळ येथील पूल कोसळला आहे. कुंभारवाड्यातील वायकर यांचे घर कोसळले आहे. मुठवली येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोकणात मुसळधार, मिनीट्रेनच्या स्थानकात साचले पाणी
By admin | Published: August 02, 2016 2:54 AM