पुणे : पाटा- वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी मिळेल वाचल्यावर अनेकांची पावलं तिकडे वळतात. मोठं अंगण, सारवलेली जमीन, पाट्यावर वाटलेला मसाला, चुलीवरची भाकरी असं वर्णन थेट आपल्याला गावची आठवण करून देत. वाढत्या शहरीकरणात अंगण कमी झाले आणि फ्लॅट आले, चूल गेली, गॅस आला आणि पाटा-वरवंटा गेला, मिक्सर आला. अर्थातच यामागे ज्या समाजांचे त्यावर पोट भरत होते त्यांचे अर्थकारणही बिघडले आहे. त्यापैकीच एक म्हणजे पाथरवट समाज.
रस्त्याच्या कडेला आवाज करत छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या मूर्ती आणि स्वयंपाक घरातील साधन बनवण्याची कला हातात असणाऱ्या या समाजातले कलाकार शेवटचे ठरणार आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीने हे काम थांबवून केव्हाच दुसरे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाच्या हव्यासाने अजून एका कलेचा जीव गेल्याचं हे अगदी अलीकडंच उदाहरण आहे. पुणेच नाही तर संपूर्ण राज्यात ठिकठिकणी दगड फोडून मोठ्या प्रयत्नाने त्यापासून वस्तू घडवणारे कलाकार आहेत. पूर्वी त्यांना या वस्तूंच्या बदल्यात कधी पैसे तर कधी धान्यही मिळायचं. आता मात्र घरात मांडायला किंवा मुलांना दाखवायला म्हणून या वस्तू नेल्या जातात. ग्रामीण बाजाच्या वस्तूंना बाजारपेठेत असणारी प्रचंड मागणी त्यांच्यापर्यंत अजूनही पोचली नसल्याने त्यांच्या वस्तू अनेक जण बाहेर जाऊन विकतात आणि हे मात्र दिवस साजरा झाल्याचे समाधान मानतात.
पुण्याच्या कर्वेनगर भागात धोत्रे कुटुंब राहते. त्यांना कुठल्या पिढीपासून हे काम करतात याची अचूक माहितीही नाही. मात्र कळायला लागलं तेव्हापासून वडील, आजोबा हेच काम करायचे असे ते सांगतात. त्यापैकी शामराव धोत्रे म्हणाले की, या कामाला कष्ट फार. त्यातच एका जागी बसून पाठ दुखायला लागते. प्रत्येकवेळी गिऱ्हाईक येईलच असं नाही.आता मुलं-बाळ हे काम नाही म्हणतात.आम्ही शिकलो नाही म्हणून हेचं काम केलं.त्यांचे बंधू रघुनाथ धोत्रे म्हणाले की, पूर्वी दगडी मूर्तींना मागणी असायची. आता ती नसल्यामुळे ते कामही थांबवलं आहे. अनेक डॉक्टर, सुशिक्षित लोक पाटा घ्यायला येतात, त्यांच्याकडे मसाला वाटायला वेगळे लोक असल्याचं ऐकून आश्चर्य वाटत असल्याचंही ते सांगतात.सरकारने निदान जातीचा दाखल तरी द्यावा अशी त्यांची मागणी आहे