सुधीर गाडगीळ
पुणे, दि.१ - वाढत्या शहरात देवतांची देऊळं ज्या भव्य स्वरुपात उभारली जाण्याचा टेंड्र गेल्या काही वर्षात वाढतोय, त्यामुळे त्या देव-देवींच्या सणालाही सार्वजनिक उत्सवाचे रुप येत आहे. वर्गण्या, मोठे मंडप, नट वा राजकारण्याच्या हस्ते पूजा, सामूहिक आरत्या, उत्सवाचे निमित्त करुन लाखांचे पुरस्कार, असेही काहीसे व्यावसायिक बेगडी रूप या सणांना येत आहेत. माझ्या पिढीने मात्र लहानपणी गणपती असो वा नवरात्र, या उत्सवांमध्ये मराठी संस्कृतीची सांस्कृतिकता जपणारे, चालीरितींचे दर्शन घडवणारे कार्यक्रम अनुभवले होते.
'नवरात्र' म्हटले की पाटावर हत्तीचे चित्र काढून देण्याची जबाबदारी कलावंत भावाची आणि बहीण तिच्या मैत्रिणींसह त्या हत्तीभोवती ऐलोमा-पेलोमाचा सुरेल फेर धरुन, भोंडला साजर करणार. भोंडल्याची खिरापत काय वाटणार, याचे गुपित बाळगणे हा विशेष आयटम असे. वाटली डाळ किंवा साखरखोबरे यापेक्षा फारशी वेगळी खिरापत नसे पण ती काय आहे, याची उत्सुकता वाढवणे, हा महत्त्वाचा भाग असे. अलंकार, साजशृंगार, हार, पैठणींचे काठ आणि कपाळी माखलेला कुंकूवाचा मळवट पहा यात रंगवलेल्या देवींच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून रांगा लागलेल्या.
खास करुन पुण्याच्या मध्यवस्तीत नगराची देवता म्हणून असलेल्या बुधवारातल्या जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागणे हा चर्चेचा विषय असे. विद्यापीठ चौकात चतुःश्रृंगी देवीच्या पुढे माथा टेकवण्यासाठीही गडावर रीघ लागे. आमच्या लहानपणी गणेशखिंड झालेली नव्हती. सेनापती बापट रस्ता व्हायचा होता. स्वाभाविकच फर्ग्यूसन रोडने, शेतकी कॉलेज चौकातून विद्यापीठाकडे जाणा-या रस्त्यावर, मध्यरात्रीनंतर झूंडीने मंडळी डोक्यावर पोरांना घेऊन, 'चतुःश्रृंगी माता की...' चा जयघोष करत देवी दर्शनाला जात. देवीच्या देवळाच्या गडाच्या पायाशी असलेल्या स्टॉल्समध्ये कशा-कशावर बसून 'फोटो' काढून घेणे, ही आवश्यक बाब असे.
मण्यांची माळ, डोईवर टोप, तेलकट मळलेल्या अंगाखांद्यावर हळद कुंकूवाचा सडा आणि हातात पेटती मशाल घेऊन फिरणा-या भूत्यांच्या मशालीच्या जाळावरुन हात फिरवून, कपाळावर नेणे, हा श्रद्धायुक्त ड्युटीचा भाग होता. प्रत्यक्ष शहराच्या मध्यवस्तीतील देवळांमध्ये आणखी एक गोष्ट ( आता पूर्ण लापता झालेली) पाहायला मिळे, नऊवारी नेसलेल्या, घामाने डबडबलेल्या, कुंकू नाकावर घरंगळलेल्या, केसाचे चक्कर करुन, वेणी वा गजरा माळलेल्या, हातात घागरी घेऊन, त्यात फुंकर मारत, उड्या मारत, देवीच्या स्मरणात तल्लीन झालेल्या, अंगात आलेल्या 'बायका'.
घरगुती अडचणी-प्रश्न त्यांना विचारणा-यांची भोवती गर्दी असे. दम खात टप्प्याटप्प्याने प्रत्येक समस्येवर अंगात आलेल्या बायका उत्तर देत, सासूला काय सूनवा, ते सूनेच्या अंगात आलेल्या मैत्रिणीला आधीच पढवलेले असे, म्हणे !खिरापती, भोंडले, मशाली घेतलेले नृत्ये, आरत्या आणि नऊवारी पैठणीतील, घागरी हातात घेऊन जाणा-या, घराघरातील देवींची फौज हे दृश्यच आता पुसले गेले आहे. आता फक्त मंडपांचा आकार नि स्पीकर्सचा व्हॉल्यूम वाढला आहे.