राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 25 - आजाराचे योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर त्या रुग्णाला सततच्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना वसई येथील ६४ वर्षीय मेरी पीटर यांच्या बाबतीत घडली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांच्या उजव्या पायामध्ये एक छोटीशी जखम होऊन त्यातून सतत रक्तमिश्रित स्त्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही तो बरा होत नसल्याने अखेर त्यांच्यावर मीरारोड येथे नुकतीच यशस्त्री शस्त्रक्रिया झाल्याने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे अस्थिव्यंग तज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी सांगितले. मेरी यांना १२ व्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली होती. त्याचे नेमके निदान न झाल्याने त्यावर तात्पुरता उपचार होत होता. उपचारातील तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या पायातील जखमेतून रक्तमिश्रित स्त्राव होत होता. सततच्या तात्पुरत्या उपचारात त्यांच्या पायावर गेल्या ५० वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ६२ व्या वर्षांनंतरही मेरी यांना नेहमीचा आजार त्रासदायक ठरू लागला. या आजारामुळे त्यांचे कुटुंबासोबत घराबाहेर जाणेही बंद झाले. त्यातच त्यांच्या सततच्या आजाराला कुटुंबही कंटाळले होते. दरम्यान त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालय गाठले. त्यांनी अस्थिव्यंग तज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांची भेट घेत त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. यानंतर मेरी यांना काही दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे काही नमुने तपासण्यात आले. त्यांत मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याला वैद्यकीय भाषेत ओस्टोटॉमी म्हटले जाते. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड बसविण्यात आला. या प्रक्रियेला कॉर्टिकल विंडो प्रोसेस संबोधले जाते. त्यांच्या पायातुन रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसविण्यात आलेला रॉड नुकताच काढण्यात आला. यानंतर मेरी यांचा आजार पूर्णपणे बरा झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. याबाबत माहिती देताना डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले, लहानपणी शरीराला झालेल्या कोणत्याही जखमेवर त्वरित व पूर्णपणे उपचार करणे फार गरजेचे असते. अपूर्ण व चुकीचा उपचार रुग्णाला आयुष्यभर सतावत राहतो. ग्रामीण भागात अशा प्रकारचे अनेक रुग्ण आढळून येतात. ६४ वर्षीय मेरी यांच्यावरही अचूक निदान न झाल्यामुळे गेल्या पन्नास वर्षात त्यांच्यावर अनेक चुकीच्या शस्रक्रिया झाल्या. अशा घटना टाळण्यासाठी वेळेत योग्य व पुर्ण उपचार करणे, हाच एकमेव उपाय आहे.
विचित्र : १२ व्या वर्षी जडलेला आजार ६४ व्या वर्षी झाला बरा
By admin | Published: April 25, 2017 5:08 PM