मुंबई - काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भोकर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या सल्ल्याबाबतचे मत मांडले आहे. भाजपाने आपल्या सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंना या यादीत स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे नेटीझन्सकडून खडसेंबद्दल सहानुभूती तर तावडेंची खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यात, आता अशोक चव्हाण यांचीही भर पडली आहे.
काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महाआघआडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंना भाजपाने उमेदवारी न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच, अशी वेळ कुणावरही येऊ नये. आज मी त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय झाल्या असतील, हे समजू शकतो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यानंतर, आता अशोक चव्हाण यांनीही आपला तावडेंनी दिलेल्या सल्ल्याला उत्तर दिलंय.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे म्हणत तावडेंनी अशोक चव्हाणांना डिवचणारे वक्तव्य केलं होतं. लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात, त्यामुळे विधानसभेत झाकली मुठ ठेवा, असा सल्लाही त्यांनी चव्हाण यांना दिला होता. काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही, त्यामुळे लोकच त्यांना विधानसभेत नाकारतील, असे तावडेंनी म्हटले होते. मात्र, आज तावडेंचच तिकीट भाजपाने कापलं आहे. त्यामुळे तावडेंवरच विधानसभेत न जाण्याची वेळ आली आहे. तावडेंच्या या विधानाचा योग्य वेळेची संधी साधून अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे. निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.