सध्या महाराष्ट्रातच नाही, तर देशातही अनेक ठिकाणी भोंगे आणि हनुमान चालीसा या विषयांची चर्चा आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील गुढीपाडव्या निमित्त आयोजित सभेदरम्यान मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाच्या विषयावर भाष्य केलं. पण तुम्हाला माहितीये महाराष्ट्रातही असं एक गाव आहे, ज्या ठिकाणी हनुमानाला पूजलं जात नाही. याशिवाय या गावात मुलांचं नावचं काय, पण कोणी मारूतीची साधी गाडीही घेत नाही.
अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील 'नांदुर निंबादैत्य' गावात हे भारतातील एकमेव दैत्य मंदिर आहे. येथील लोक दैत्याला आपले कुलदैवत मानून त्याची पूजा करतात. या गावात हनुमानाचे एकही मंदिर नसून, हनुमानाच्या नावाचा उच्चार करणे देखील या गावात अपशकून मानला जातो.
प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात नाशिक येथून केदारेश्वराकडे वाल्मिक ऋषींच्या भेटीसाठी जात असताना गावातील जंगलात त्यांचा मुक्काम झाला. या जंगलात त्यावेळी 'निंबादैत्य' राक्षसाचे वास्तव्य होते. या राक्षसाने त्यावेळी प्रभू रामचंद्राची मनोभावे पूजा केली आणि त्यांचा भक्त झाला. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्याला या गावात तुझे वास्तव्य राहील आणि गावकरी तुला कुलदैवत मानून तुझी पूजा करतील असा वर दिला. तसेच गावात हनुमानाचे मंदिर नसेल. तेव्हापासून या ठिकाणी या दैत्याची गावकरी मनोभावे पूजा करतात.
गाडीचीही खरेदी नाहीजर हनुमानाच्या नावावरून कोणाचंही नाव ठेवलं किंवा मारुती या कंपनीची गाडी जरी घेतली, तर त्या व्यक्तीवर काही संकट येत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळेच या गावात हनुमानाची पूजा केली जात नाही. तसंच मुलांचं नावही यावरून ठेवलं जात नाही आणि मारुती या कंपनीची गाडीदेखील कोणी गावकरी घेत नाही.