अजित पवार यांना कुटुंबाविरोधात निवडणूक लढवावी लागत आहे. सर्व पवार कुटुंबीय एकीकडे आणि अजित पवार यांचे कुटुंब एकीकडे. अजित पवारांनी निर्णयच असा घेतलाय की त्याची झळ त्यांना सोसावी लागत आहे. अशातच आधी सख्खा भाऊ-वहिणी विरोधात असताना आता रोहित पवारांच्या मातोश्री देखील प्रचाराला लागल्या आहेत. या सुनंदा पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
बारामतीच्या प्रत्येक गावात आज अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत. हे लोक वेगळ्या भाषेतही बोलत आहेत. मतदानाच्या आधीच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांत गावागावात धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल, असा दावा सुनंदा पवार यांनी केला आहे. बारामतीच्या जळगाव सुपे गावात त्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सावध केले आहे.
अजित पवारांना एकाचवेळी सर्व भाऊ, काका, पुतण्यांविरोधात लढावे लागत आहे. आधी शरद पवारांवरच आरोप करणारे अजित पवार आता इतर कुटुंबीयांवरही आक्रमकपणे आरोप करू लागले आहेत. रोहित पवार यांचे वडीलही प्रचार करत आहेत, त्यांनाही अजित पवारांनी प्रत्यूत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच भावनिक होत अजित पवार हे बारामतीकरांना आवाहन करू लागले आहेत. शरद पवार भावनिक होतील, रडतील असे सांगू लागले आहेत. एकंदरीतच ही निवडणूक पवार वि. पवार जरी असली तरी पवार कुटुंबात चांगलेच वितुष्ट आणणारी ठरणार आहे.
पुन्हा एकत्र येणार का? वर काय म्हणालेले अजितदादा...अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील नाते ताणले गेलेले आहे. निवडणुकीपूर्वी दिवाळी दरम्यानच्या बैठका, कधी उद्योगपतीच्या घरी लपून-छपून जाणे कधी कुटुंबीयांच्या घरी भेटणे असे प्रकार होत आले आहेत. यानंतर अचानक अजित पवारांनी आक्रमक भुमिका घेत शरद पवारांनावर गंभीर आरोप केले होते. आता तर सुप्रिया सुळेंच्याच विरोधात पत्नीला उभे करत थेट आव्हान दिले आहे. राजकारणात कधी कोणा कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे राजकारण संपले की हे दोघे एकत्र आले तर काय, अशी चर्चा ही सुरु आहे. तुम्ही दोघे परत एकत्र येणार का, असा सवाल एका कार्यक्रमात अजित पवारांना विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी एकदा ७ मे रोजीचे मतदान होऊ द्या, तोवर मी यावर बोलू शकत नाही असे म्हटले आहे.