मुंबई – मागील अनेक दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई क्रुझवरील पार्टी प्रकरणावरुन मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी NCB अधिकारी समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला. त्यानंतर थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले. भाजपा नेत्यांशी ड्रग्सशी संबंध असल्याचा दावा मलिकांनी केला. मलिकांच्या या आरोपांवर फडणवीसांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला.
आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रणनीती आखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीत भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांबाबत बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली.
याबाबत केशव उपाध्ये म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस मा. सी. टी. रवी करणार आहेत. कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून त्याची चर्चा राजकीय ठरावात करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजपा प्रभावी कामगिरी करत आहे. पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होईल. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे उपस्थित राहणार आहेत. कार्यकारिणी बैठकीस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे मुंबईत उपस्थित राहतील. तसेच विविध जिल्हास्थानी पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने कार्यकारिणी बैठकीत सहभागी होतील अशी माहितीही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.